गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

Gondeshwar Temple, Sinnar

                        गोंदेश्वर मंदिर, सिन्नर 

गोंदेश्वर मंदिर हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणना होते.

अशी आहे रचना


   हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे. रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.

मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट  बाय ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे. नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते.
 

Harischhandreshwar Temple, Harischhandragad Akole, Dist- AhamadNagar

हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड अकोले

 अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहेत. मुख्य मंदिराची उंची सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ैमंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य असेच आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. याच खोलीत ैचांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केलेले आहे, असे स्थानिक गावकरी सांगतात.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झंज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या घळीमध्ये केदारेश्वराचे भव्य लेणे आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. प्रदक्षिणा मारता येते. मुख्य मंदिराला पूर्व आणि पश्चिम असे दोन दरवाजे आहेत. गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग आणि त्याच्या पुढ्यात नंदी विराजमान आहे. या देखण्या शैल मंदिराच्या शिखर, भिंती, खंब आणि प्रवेशद्वारावर सगळीकडे मुक्त हस्ते कोरीव काम केलेले आढळते. देव-देवता, प्राणी, रत्न, रूप, निसर्ग आदी रूपके आणि भौमितिक रचना याची वीण अत्यंत कौशल्याने गुंफली आहे. म्हणूनच उत्तरेतील बुद्ध् गयेच्या मंदिराशी येथील मंदिराची तुलना करण्याच्या मोह गो.नी.दांडेकर यांच्यासारख्या अभ्यासकाला आवरला नाही. योगी चांगदेवांनीही तत्त्वसार ग्रंथाची रचना येथेच केली. ग्रंथातील १०२८ ते १०३३ दरम्यानच्या ओव्यांमध्ये याबाबतचा उल्लेख आहे.
हरिश्चंद्र नाम पर्वतू! तेथ महादेवो भवतु !!
सुसिध्द गाणी विख्यातु! सेविजे जो!! (१०२९ )
हरिश्चंद्र देवता! मंगळ गंगा सरिता!
सर्वतीर्थ पुरविता! सप्तस्थान !! (१०३०)
तत्त्वसार प्रमाणेच स्कंद, अग्नी, मस्त्य आणि पद्म पुराणांतही या पर्वताची महती वर्णने केली आहे. तेराव्या शतकात ज्ञानदेव निवृत्ती आणि इतर भावंडे यात्रापर्वात येथे येऊन गेल्याचे इतिहास सांगतो. ऋतूंचे प्रहार वषार्नुवर्षे झेलत मोडकळीला आलेले हे शिवालय उभे आहे.

बुधवार, २ एप्रिल, २०१४

Tahakari Jagdamba Mandir




टाहाकरीचे प्राचीन मंदिर
अकोले तालुक्यातील टाहाकरीचे जगदंबा मातेचे  मंदिर भूमिज प्रकारचे असून, त्याचा तलविन्यास सप्तरथ प्रकारचा आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून मुखमंडप, त्यामागे दोन बाजूस एक एक अंतराळयुक्त उपगर्भगृह असलेला मंडप आहे. त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुख मंडप अशी मंदिराची देखणी रचना आहे. यातला मुख मंडप दहा खांबांवर आधारलेला असून, त्यावरूनच मंदिराची भव्यात लक्षात येते. अर्ध्यापर्यंत भिंत या भिंतीचा बाह्यभाग आणि या खांबांवर मुक्तहस्ते केलेले कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते. बाह्य भागावर शिव-पार्वती, गणेश, देवी-देवता, हत्ते, व्याल, घोडे, असे प्राणी. यक्ष-यक्षिणी, अप्सरा, सूरसुंदरी, आदी देवगण आणि जोडीने काही मैथुनशिल्पे कोरली आहेत. मुखमंडपातच भिंतीलगत बसायला ओटे बांधले आहेत.

मंदिराचा मंडप बारा खांबांवर उभा आहे. पुढे तीन दिशांना गर्भगृहे आहेत. मुख्य गाभारा आणि सभा मंडप या दरम्यान अंतराळाची रचना केलेली आहे. अंतराळ आणि सभामंडपाच्या खांबावर विविध भौमितिक आकृत्या, यक्ष प्रतिमा आणि देवतांचे मुतीर्काम केले आहे. सभामंडपाच्या छतावर एकत् एक गुंफलेली वतुर्ळे आणि त्याच्या मधोमध लटकलेले एक दगडी झुंबर आहे. अंतराळात तीन भद्रांवर तीन देवकोष्ठे आहेत. मुख्य दरवाजावरही बारीक बारीक नक्षीकाम केलेले असून त्याच्या शीर्षपट्टीवर गणेश ऐवजी देवीची संकेतमुर्ती स्थापन केली आहे. बाहेर आले की तिकडचे मुतीर्काम पाहून आपण थक्क होवून जातो. मंदिराची बाह्य रचना तारकाकृती आहे. ही भिंत अगदी छोट्या छोट्या कोनात दुमडली आहे. दुमडलेल्या या भिंतीवर ओळीने मूतीर्काम केले आहे. खरे सांगायचे तर टाहाकारी मंदिराचे हेच मुख्य आकर्षण असते. गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सूरसुंदरींचे तब्बल बावीस प्रकारचे आविष्कार येथे प्रकटले आहेत! सूर सुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. कोण आरशात स्वत:ची सुंदरता न्याहाळतेय... कोण केशरचना करण्यात गुंग आहे... कुठे नृत्य अवस्थेतील सुंदरी तर कोणी बासुरी-मृदुंग वाजविणाऱ्या... हाती पक्षी घेतलेल्या शुक सारिका, मुलाला घेतलेल्या वात्सल्य मूर्ती असे त्रिभंग अवस्थेतील नाना शिल्पाविष्कार आचंबित करतात! मुख्य मंदिराशेजारील मोडकळीस आलेल्या मंदिरावर एक शिलालेख आढळला. साल दिले होते शके १०५०. म्हणजेच इसवी सन ११२८! त्यावरून या मंदिराच्या निमार्णाच्या काळात जाता येते. काळाचा पुरावा तसेच स्थापत्य शैली यावरून हे मंदिर यादवकालीन असल्यावर शिक्कमोर्तब होते.

टाहाकारी मंदिरासारखी आणखीन काही शिल्पे खेडोपाडी उपेक्षित आहेत. या मंदिराचे आणखीन एक दु:ख म्हणजे हजार आकाराशे वर्षे जुने असलेल्या या मंदिरावर आर.सी.सी. मंडप चढवण्यात आलाय. रंगरंगोटी केल्याने मूतीर्ना शेंदूर थापल्याने मूळ सौंदर्यची नजाकत हरपल्याची खंत जाणकार व्यक्त करीत आहेत. हेमांडपंती वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या मंदिराचा कायापालट होणे आवश्यक आहे.

बुधवार, १९ मार्च, २०१४

Ghrishneswar Temple, Verul. Dist- Aurangabad

                     घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ
वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग. १८ व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार इंदोरच्या राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. पूर्वी शिवाजी महाराजांच्या आजोबांनी या मंदिरासाठी शेतात सापडलेले धन दिले होते असे इतिहासात नमूद करण्यात आले आहे. मालोजीराजे असे त्यांचे नांव.
वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला.

लाल सँडस्टोनमध्ये बांधले गेलेले हे मंदिर वास्तूरचनेचा अतिशय सुंदर नमुना आहे. पुराणातील अनेक कथा येथे मूर्तीरूपाने कोरल्या गेल्या आहेत. त्यात शिवपार्वती विवाह, ब्रह्मा,विष्णू ,गणेश कथाही आहेत. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे शंकर महादेव ज्योतिस्वरूपात स्थित आहेत असा समज आहे.
औरंगाबाद पासून ३० किमी असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच आहे. श्रावणात येथे मोठी गर्दी असते तसेच सोमवारीही गर्दी खूप असते. जागृत देवस्थान मानले गेल्याने येथे सतत पूजा, अभिषेक यासाठी भाविक येत असतात. आपल्याला मंदिरातील शिल्पकलेचाही आस्वाद घ्यायचा असेल तर गर्दीचे दिवस टाळूनच येथे जाणे चांगले.

AVfe AfWZX A£¹ffd¹fIYf
  या मंदिराचीही सुंदर कथा सांगितली जाते. घृष्णा आणि सुदेहा अशा दोघी बहिणी होत्या आणि सख्या सवतीही होत्या. म्हणजे दोघींनी एकाच माणसाशी विवाह केला होता. मात्र दोघींनाही मूलबाळ नव्हते. घृष्णा मोठी शिवभक्त होती आणि शंकराची नित्यनेमाने पूजा व उपासना करत असे. त्याचे फळ म्हणून तिला पुत्र झाला मात्र सवती मत्सराने जळत असलेल्या सुदेहेने या मुलाला ठार मारले व नदीत फेकले. घटना घडली तेव्हा घृष्णा शिवपुजेत होती मात्र मुलाला ठार केल्याचे ऐकूनही ती किचितही विचलीत झाली नाही अथवा तिने पूजा अर्धवटही सोडली नाही. तिचे एकच म्हणणे होते की ज्याने मला पुत्र दिला आहे, तोच त्याचे रक्षण करेल. तिची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. मात्र त्याने आईला सांगितले की सुदेहेला तू क्षमा कर. घृष्णेच्या भक्तीने शंकर प्रसन्न झालाच होता तेव्हा तिने ज्योतिरूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करा अशी शंकराला प्रार्थना केली आणि शंकरानेही तिची प्रार्थना ऐकली. घृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर असे नांव पडले.

Bhimashankar Temple, Tal-Khed, Dist-Pune

                       भिमाशंकर मंदिर, ता. खेड, जि. पूणे
भिमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.  निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.

हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही.  मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.  शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभाºयातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
 गुप्त भीमाशंकर - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिलिंर्गात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूवेर्ला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

 कोकण कडा- भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.

सीतारामबाबा आश्रम- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
नागफणी - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

  

रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

Bhuleshwar Temple, Malshiras

  

       भुलेश्वर मंदिर, माळशिरस जि. पूणे


 पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले भुलेश्वर हे ऐतिहासिक ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलत: हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा‍ऱ्यात शिवलिंग आहे. मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते.

मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. 

   अशी आहे रचना

मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. 
मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. 

17 व्या शतकात जीर्णोद्धार


यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे. १६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर दौलत मंगळ नावाचा किल्ला मांडला.  या किल्ल्याचा भग्न बुरूज देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली.  संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी हे बांधकाम केले.  दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे.  येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार भुलेश्रर येथून होत होता.
पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते.

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

Mahalaxmi Mandir, Kolhapur

                                महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

  

कोल्हापूरची अंबाबाई करवीर निवासीनी खºया अर्थाने महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. येथील महालक्ष्मी मंदिर पुरातन उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी 1 आहे. तर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपिठांपैकी 1 पीठ गणले जाते. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात इसवी सन 600 ते 700 च्या काळात बांधले असण्याची शक्यता आहे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरुन अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. मुस्लिमांनी देवळ्याचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती अनेक वर्षे पुजा-याने लवपून ठेवली होती. पूढे संभाजी महाराजांच्या काळात इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक यामुळेच पडला असावा.

अशी आहे मंदिराची वास्तू

हे देवालय आकराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी किंवा आयताकृती दगडात करण्यात आलेली आहे. मंदिर पश्चिमभिंमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरुच्या खांबाचा व इप्सिदार कमानी असलेला सभमंडप प्रवेश केल्यावर दिसतो. मंदिराचे चार महत्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा असून उत्तरेकडे असलेली मोठी घंटा दिवसातून पाच वेळा वाजविली जाते. तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाºया सभामंडपास महानाट मंडप असे नाव देण्यात आले आहे. देवळाच्या भिंतीवर नर्तिका, वाद्ये वाजविणाºया स्त्रिया, मृदंग, टाळकरी, टाळकरी, वीणावादी, अप्सरा व योद्धे कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विना चुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत.


शिलालेख
मंदिराच्या चार वेगवेगळ्या भागात शिलालेख कोरलेले आहेत. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरिश्वराच्या देवळाच्या भिंतीवर शके 1940 मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके 1158 चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोट्या देवळातील एका खांबावर आहे. तर चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करतांना लागतो.