बुधवार, १९ मार्च, २०१४

Ghrishneswar Temple, Verul. Dist- Aurangabad

                     घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ
वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग. १८ व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार इंदोरच्या राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. पूर्वी शिवाजी महाराजांच्या आजोबांनी या मंदिरासाठी शेतात सापडलेले धन दिले होते असे इतिहासात नमूद करण्यात आले आहे. मालोजीराजे असे त्यांचे नांव.
वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला.

लाल सँडस्टोनमध्ये बांधले गेलेले हे मंदिर वास्तूरचनेचा अतिशय सुंदर नमुना आहे. पुराणातील अनेक कथा येथे मूर्तीरूपाने कोरल्या गेल्या आहेत. त्यात शिवपार्वती विवाह, ब्रह्मा,विष्णू ,गणेश कथाही आहेत. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे शंकर महादेव ज्योतिस्वरूपात स्थित आहेत असा समज आहे.
औरंगाबाद पासून ३० किमी असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच आहे. श्रावणात येथे मोठी गर्दी असते तसेच सोमवारीही गर्दी खूप असते. जागृत देवस्थान मानले गेल्याने येथे सतत पूजा, अभिषेक यासाठी भाविक येत असतात. आपल्याला मंदिरातील शिल्पकलेचाही आस्वाद घ्यायचा असेल तर गर्दीचे दिवस टाळूनच येथे जाणे चांगले.

AVfe AfWZX A£¹ffd¹fIYf
  या मंदिराचीही सुंदर कथा सांगितली जाते. घृष्णा आणि सुदेहा अशा दोघी बहिणी होत्या आणि सख्या सवतीही होत्या. म्हणजे दोघींनी एकाच माणसाशी विवाह केला होता. मात्र दोघींनाही मूलबाळ नव्हते. घृष्णा मोठी शिवभक्त होती आणि शंकराची नित्यनेमाने पूजा व उपासना करत असे. त्याचे फळ म्हणून तिला पुत्र झाला मात्र सवती मत्सराने जळत असलेल्या सुदेहेने या मुलाला ठार मारले व नदीत फेकले. घटना घडली तेव्हा घृष्णा शिवपुजेत होती मात्र मुलाला ठार केल्याचे ऐकूनही ती किचितही विचलीत झाली नाही अथवा तिने पूजा अर्धवटही सोडली नाही. तिचे एकच म्हणणे होते की ज्याने मला पुत्र दिला आहे, तोच त्याचे रक्षण करेल. तिची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. मात्र त्याने आईला सांगितले की सुदेहेला तू क्षमा कर. घृष्णेच्या भक्तीने शंकर प्रसन्न झालाच होता तेव्हा तिने ज्योतिरूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करा अशी शंकराला प्रार्थना केली आणि शंकरानेही तिची प्रार्थना ऐकली. घृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर असे नांव पडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा