गोंदेश्वर मंदिर, सिन्नर
अशी आहे रचना
हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे. रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.
मंदिराची वास्तू पायर्या पायर्यांनी बनलेल्या १२५ फूट बाय ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे. नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा