गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

Harischhandreshwar Temple, Harischhandragad Akole, Dist- AhamadNagar

हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड अकोले

 अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहेत. मुख्य मंदिराची उंची सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ैमंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य असेच आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. याच खोलीत ैचांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केलेले आहे, असे स्थानिक गावकरी सांगतात.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झंज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या घळीमध्ये केदारेश्वराचे भव्य लेणे आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. प्रदक्षिणा मारता येते. मुख्य मंदिराला पूर्व आणि पश्चिम असे दोन दरवाजे आहेत. गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग आणि त्याच्या पुढ्यात नंदी विराजमान आहे. या देखण्या शैल मंदिराच्या शिखर, भिंती, खंब आणि प्रवेशद्वारावर सगळीकडे मुक्त हस्ते कोरीव काम केलेले आढळते. देव-देवता, प्राणी, रत्न, रूप, निसर्ग आदी रूपके आणि भौमितिक रचना याची वीण अत्यंत कौशल्याने गुंफली आहे. म्हणूनच उत्तरेतील बुद्ध् गयेच्या मंदिराशी येथील मंदिराची तुलना करण्याच्या मोह गो.नी.दांडेकर यांच्यासारख्या अभ्यासकाला आवरला नाही. योगी चांगदेवांनीही तत्त्वसार ग्रंथाची रचना येथेच केली. ग्रंथातील १०२८ ते १०३३ दरम्यानच्या ओव्यांमध्ये याबाबतचा उल्लेख आहे.
हरिश्चंद्र नाम पर्वतू! तेथ महादेवो भवतु !!
सुसिध्द गाणी विख्यातु! सेविजे जो!! (१०२९ )
हरिश्चंद्र देवता! मंगळ गंगा सरिता!
सर्वतीर्थ पुरविता! सप्तस्थान !! (१०३०)
तत्त्वसार प्रमाणेच स्कंद, अग्नी, मस्त्य आणि पद्म पुराणांतही या पर्वताची महती वर्णने केली आहे. तेराव्या शतकात ज्ञानदेव निवृत्ती आणि इतर भावंडे यात्रापर्वात येथे येऊन गेल्याचे इतिहास सांगतो. ऋतूंचे प्रहार वषार्नुवर्षे झेलत मोडकळीला आलेले हे शिवालय उभे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा