बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

Tryambakeshwar Temple



               त्र्यंबकेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर , जि. नाशिक 



 नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखले जाते. नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर ब्रम्हागिरीच्या पायथ्याशी हे स्थान असून आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे दक्षिण भारतातील एकमेव कुंभमेळ्याचे ठिकाण आहे. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो, तसेच दरवर्षी निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकेश्वराची यात्रा भरते. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी येथेच उगम पावते.

त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1755-1786 या काळात नानासाहेब पेशवे यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. त्रिपिंडी नारायण नागबलीचा विधी देशात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केला जातो. जवळच असलेल्या ब्रम्हागिरी पर्वतावरुन महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्चाच्या असलेल्या गोदामाईचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार, संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीमंदिर, नील पर्वत, अंजेनरी, गंगाद्वार, गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थांचे पीठ याच ठिकाणी असल्याने या स्थळाला अनन्य साधारण महत्व आहे. 

 अशी आहे अख्यायिका

पुराणातील अख्यायिकानुसार गौतमऋषी यांनी येथील ब्रम्हगिरीवर शंकराची तपश्चर्या करुन त्यास प्रसन्न केले होते. प्रसन्न झालेल्या शंकराने गौतमऋषींच्या इच्छेनुसार गौतमी आणि गोदावरी यांना स्वर्गातून भूमिवर आणले. गोदावरीचा ओघ गौतम ऋषींनी कुशावर्तावर थोपवला. त्याचेच नाव कुशावर्त कुंड, जे भक्तांचे तीर्थस्थान बनले. त्र्यंबकेश्वर हे शंकराचे मंदिर असून दर सोमवारी गावातून पालखीची मिरवणूक काढली जाते. शिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रेकरुंची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. 

 कुंभमेळ्यामुळे स्थळाला झळाली

दर 12 वर्षांनी भरणा-या कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वराला तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. हिंदु धर्मात कुंभमेळा हा सर्वात पवित्र सण मानला जातो. त्यावेळी संपूर्ण भारतातील साधू, सन्यासी, संत, सत्पुरुष आणि सामान्य भक्तगण लाखोंच्या संख्येने त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन होतात.
-----


गोदावरी तटी, एका ठायी नांदताती, ब्रम्हा, विष्णू, महेश ।
वैंकुंठ चतुर्दर्शी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेज ज्योतिर्लिंगास ।त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ।। 

कुशावर्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा