रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

Bhuleshwar Temple, Malshiras

  

       भुलेश्वर मंदिर, माळशिरस जि. पूणे


 पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले भुलेश्वर हे ऐतिहासिक ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलत: हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा‍ऱ्यात शिवलिंग आहे. मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते.

मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. 

   अशी आहे रचना

मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. 
मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. 

17 व्या शतकात जीर्णोद्धार


यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे. १६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर दौलत मंगळ नावाचा किल्ला मांडला.  या किल्ल्याचा भग्न बुरूज देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली.  संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी हे बांधकाम केले.  दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे.  येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार भुलेश्रर येथून होत होता.
पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते.

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

Mahalaxmi Mandir, Kolhapur

                                महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

  

कोल्हापूरची अंबाबाई करवीर निवासीनी खºया अर्थाने महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. येथील महालक्ष्मी मंदिर पुरातन उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी 1 आहे. तर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपिठांपैकी 1 पीठ गणले जाते. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात इसवी सन 600 ते 700 च्या काळात बांधले असण्याची शक्यता आहे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरुन अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. मुस्लिमांनी देवळ्याचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती अनेक वर्षे पुजा-याने लवपून ठेवली होती. पूढे संभाजी महाराजांच्या काळात इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक यामुळेच पडला असावा.

अशी आहे मंदिराची वास्तू

हे देवालय आकराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी किंवा आयताकृती दगडात करण्यात आलेली आहे. मंदिर पश्चिमभिंमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरुच्या खांबाचा व इप्सिदार कमानी असलेला सभमंडप प्रवेश केल्यावर दिसतो. मंदिराचे चार महत्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा असून उत्तरेकडे असलेली मोठी घंटा दिवसातून पाच वेळा वाजविली जाते. तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाºया सभामंडपास महानाट मंडप असे नाव देण्यात आले आहे. देवळाच्या भिंतीवर नर्तिका, वाद्ये वाजविणाºया स्त्रिया, मृदंग, टाळकरी, टाळकरी, वीणावादी, अप्सरा व योद्धे कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विना चुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत.


शिलालेख
मंदिराच्या चार वेगवेगळ्या भागात शिलालेख कोरलेले आहेत. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरिश्वराच्या देवळाच्या भिंतीवर शके 1940 मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके 1158 चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोट्या देवळातील एका खांबावर आहे. तर चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करतांना लागतो.

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

Tryambakeshwar Temple



               त्र्यंबकेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर , जि. नाशिक 



 नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखले जाते. नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर ब्रम्हागिरीच्या पायथ्याशी हे स्थान असून आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे दक्षिण भारतातील एकमेव कुंभमेळ्याचे ठिकाण आहे. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो, तसेच दरवर्षी निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकेश्वराची यात्रा भरते. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी येथेच उगम पावते.

त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1755-1786 या काळात नानासाहेब पेशवे यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. त्रिपिंडी नारायण नागबलीचा विधी देशात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केला जातो. जवळच असलेल्या ब्रम्हागिरी पर्वतावरुन महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्चाच्या असलेल्या गोदामाईचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार, संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीमंदिर, नील पर्वत, अंजेनरी, गंगाद्वार, गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थांचे पीठ याच ठिकाणी असल्याने या स्थळाला अनन्य साधारण महत्व आहे. 

 अशी आहे अख्यायिका

पुराणातील अख्यायिकानुसार गौतमऋषी यांनी येथील ब्रम्हगिरीवर शंकराची तपश्चर्या करुन त्यास प्रसन्न केले होते. प्रसन्न झालेल्या शंकराने गौतमऋषींच्या इच्छेनुसार गौतमी आणि गोदावरी यांना स्वर्गातून भूमिवर आणले. गोदावरीचा ओघ गौतम ऋषींनी कुशावर्तावर थोपवला. त्याचेच नाव कुशावर्त कुंड, जे भक्तांचे तीर्थस्थान बनले. त्र्यंबकेश्वर हे शंकराचे मंदिर असून दर सोमवारी गावातून पालखीची मिरवणूक काढली जाते. शिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रेकरुंची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. 

 कुंभमेळ्यामुळे स्थळाला झळाली

दर 12 वर्षांनी भरणा-या कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वराला तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. हिंदु धर्मात कुंभमेळा हा सर्वात पवित्र सण मानला जातो. त्यावेळी संपूर्ण भारतातील साधू, सन्यासी, संत, सत्पुरुष आणि सामान्य भक्तगण लाखोंच्या संख्येने त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन होतात.
-----


गोदावरी तटी, एका ठायी नांदताती, ब्रम्हा, विष्णू, महेश ।
वैंकुंठ चतुर्दर्शी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेज ज्योतिर्लिंगास ।त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ।। 

कुशावर्त

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४

HEMADPANTI TEMPLE: Gondeshwar Mandir



                                     गोंदेश्वर मंदिर, सिन्नर 

गोंदेश्वर मंदिर हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणना होते.

अशी आहे रचना


   हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे. रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.

मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट  बाय ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे. नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते.