बुधवार, १९ मार्च, २०१४

Ghrishneswar Temple, Verul. Dist- Aurangabad

                     घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ
वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग. १८ व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार इंदोरच्या राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. पूर्वी शिवाजी महाराजांच्या आजोबांनी या मंदिरासाठी शेतात सापडलेले धन दिले होते असे इतिहासात नमूद करण्यात आले आहे. मालोजीराजे असे त्यांचे नांव.
वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला.

लाल सँडस्टोनमध्ये बांधले गेलेले हे मंदिर वास्तूरचनेचा अतिशय सुंदर नमुना आहे. पुराणातील अनेक कथा येथे मूर्तीरूपाने कोरल्या गेल्या आहेत. त्यात शिवपार्वती विवाह, ब्रह्मा,विष्णू ,गणेश कथाही आहेत. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे शंकर महादेव ज्योतिस्वरूपात स्थित आहेत असा समज आहे.
औरंगाबाद पासून ३० किमी असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच आहे. श्रावणात येथे मोठी गर्दी असते तसेच सोमवारीही गर्दी खूप असते. जागृत देवस्थान मानले गेल्याने येथे सतत पूजा, अभिषेक यासाठी भाविक येत असतात. आपल्याला मंदिरातील शिल्पकलेचाही आस्वाद घ्यायचा असेल तर गर्दीचे दिवस टाळूनच येथे जाणे चांगले.

AVfe AfWZX A£¹ffd¹fIYf
  या मंदिराचीही सुंदर कथा सांगितली जाते. घृष्णा आणि सुदेहा अशा दोघी बहिणी होत्या आणि सख्या सवतीही होत्या. म्हणजे दोघींनी एकाच माणसाशी विवाह केला होता. मात्र दोघींनाही मूलबाळ नव्हते. घृष्णा मोठी शिवभक्त होती आणि शंकराची नित्यनेमाने पूजा व उपासना करत असे. त्याचे फळ म्हणून तिला पुत्र झाला मात्र सवती मत्सराने जळत असलेल्या सुदेहेने या मुलाला ठार मारले व नदीत फेकले. घटना घडली तेव्हा घृष्णा शिवपुजेत होती मात्र मुलाला ठार केल्याचे ऐकूनही ती किचितही विचलीत झाली नाही अथवा तिने पूजा अर्धवटही सोडली नाही. तिचे एकच म्हणणे होते की ज्याने मला पुत्र दिला आहे, तोच त्याचे रक्षण करेल. तिची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. मात्र त्याने आईला सांगितले की सुदेहेला तू क्षमा कर. घृष्णेच्या भक्तीने शंकर प्रसन्न झालाच होता तेव्हा तिने ज्योतिरूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करा अशी शंकराला प्रार्थना केली आणि शंकरानेही तिची प्रार्थना ऐकली. घृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर असे नांव पडले.

Bhimashankar Temple, Tal-Khed, Dist-Pune

                       भिमाशंकर मंदिर, ता. खेड, जि. पूणे
भिमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.  निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.

हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही.  मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.  शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभाºयातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
 गुप्त भीमाशंकर - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिलिंर्गात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूवेर्ला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

 कोकण कडा- भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.

सीतारामबाबा आश्रम- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
नागफणी - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.