बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

Tryambakeshwar Temple



               त्र्यंबकेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर , जि. नाशिक 



 नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखले जाते. नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर ब्रम्हागिरीच्या पायथ्याशी हे स्थान असून आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे दक्षिण भारतातील एकमेव कुंभमेळ्याचे ठिकाण आहे. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो, तसेच दरवर्षी निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकेश्वराची यात्रा भरते. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी येथेच उगम पावते.

त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1755-1786 या काळात नानासाहेब पेशवे यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. त्रिपिंडी नारायण नागबलीचा विधी देशात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केला जातो. जवळच असलेल्या ब्रम्हागिरी पर्वतावरुन महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्चाच्या असलेल्या गोदामाईचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार, संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीमंदिर, नील पर्वत, अंजेनरी, गंगाद्वार, गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थांचे पीठ याच ठिकाणी असल्याने या स्थळाला अनन्य साधारण महत्व आहे. 

 अशी आहे अख्यायिका

पुराणातील अख्यायिकानुसार गौतमऋषी यांनी येथील ब्रम्हगिरीवर शंकराची तपश्चर्या करुन त्यास प्रसन्न केले होते. प्रसन्न झालेल्या शंकराने गौतमऋषींच्या इच्छेनुसार गौतमी आणि गोदावरी यांना स्वर्गातून भूमिवर आणले. गोदावरीचा ओघ गौतम ऋषींनी कुशावर्तावर थोपवला. त्याचेच नाव कुशावर्त कुंड, जे भक्तांचे तीर्थस्थान बनले. त्र्यंबकेश्वर हे शंकराचे मंदिर असून दर सोमवारी गावातून पालखीची मिरवणूक काढली जाते. शिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रेकरुंची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. 

 कुंभमेळ्यामुळे स्थळाला झळाली

दर 12 वर्षांनी भरणा-या कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वराला तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. हिंदु धर्मात कुंभमेळा हा सर्वात पवित्र सण मानला जातो. त्यावेळी संपूर्ण भारतातील साधू, सन्यासी, संत, सत्पुरुष आणि सामान्य भक्तगण लाखोंच्या संख्येने त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन होतात.
-----


गोदावरी तटी, एका ठायी नांदताती, ब्रम्हा, विष्णू, महेश ।
वैंकुंठ चतुर्दर्शी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेज ज्योतिर्लिंगास ।त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ।। 

कुशावर्त

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४

HEMADPANTI TEMPLE: Gondeshwar Mandir



                                     गोंदेश्वर मंदिर, सिन्नर 

गोंदेश्वर मंदिर हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणना होते.

अशी आहे रचना


   हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे. रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.

मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट  बाय ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे. नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते.